तिहार कारागृह आता दिल्लीबाहेर   

दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या तिहार कारागृहाचे स्थलांतर दिल्लीच्या बाहेरील भागात करण्यात येणार आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी नुकतीच अंदाजपत्रकी अधिवेशनात तुरुंग स्थलांतराशी संबंधित सर्वेक्षण आणि सल्लागार सेवांसाठी १० कोटी रुपयांची तरतूद केली आहे.

तुरुंगाचा इतिहास   

दिल्लीजवळील तिहार गावात १९५८ मध्ये या कारागृहाची स्थापना झाली. त्यावेळी कारागृहातील पायाभूत सुविधा अपुर्‍या असल्याने दिल्ली भागातील कैद्यांना येथे सामावून घेण्याचा विचार होता. मात्र, गुन्हेगारांची संख्या वाढल्याने दिवसेंदिवस त्याचा विस्तार होत गेला. हे कारागृह भौगोलिकदृष्ट्या दिल्लीत असूनही ते पंजाबच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली होते. १९६६ मध्ये कारागृहाचे प्रशासकीय नियंत्रण पंजाबमधून दिल्ली प्रशासनाकडे हस्तांतरित करण्यात आले.  

वेळोवेळी विस्तार

१९८६ मध्ये तुरुंगात अतिरिक्त सुविधा निर्माण करण्यात आल्या, त्यामुळे  हे भारतातील सर्वात मोठे कारागृह बनले. हे कारागृह ४०० एकरमध्ये पसरलेले असून, त्यात ९ मध्यवर्ती कारागृहांचा समावेश आहे. कैद्यांची वाढती संख्या पाहता तिहार कारागृहाचा वेळोवेळी विस्तार करण्यात आला आहे. 

सरकारने स्थलांतराचा निर्णय का घेतला?

तिहार क ारागृह निवासी भागापासून जवळ असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने तिहार कारागृहाचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अलीकडेच या कारागृहात कैद्यांमध्ये हिंसाचार आणि टोळीयुद्धाच्या घटनाही समोर आल्या आहेत. सूडाच्या भावनेने प्रेरित होऊन दोन कैद्यांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता, त्यामुळे कारागृहाच्या सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. १०,०२५ कैद्यांना ठेवण्यासाठी तयार करण्यात आलेल्या या इमारतीत सध्या १९,००० हून अधिक कैदी आहेत. त्यामुळे गर्दी आणि सुरक्षेची आव्हाने निर्माण झाली आहेत. गर्दी कमी करण्यासाठी दिल्ली सरकारने नवीन कारागृह संकुल विकसित करण्याचा निर्णय घेतला.

सुरक्षेचे उल्लंघन आणि गैरव्यवहार 

सुरक्षेचे उल्लंघन आणि गैरव्यवहार यासंबंधीच्या वादांमुळे तिहार कारागृह वारंवार चर्चेत असते. २०२३ मध्ये गुंड प्रिन्स तेवतिया आणि सुनील उर्फ टिल्लू ताजपुरिया यांच्या हत्येने सुरक्षेतील गंभीर त्रुटी उघड झाल्या. कारागृह अधिकारी टोळ्यांमधील शत्रुत्व प्राणघातक हल्ल्यांमध्ये रूपांतरीत होण्यापासून रोखू शकले नाहीत. कारागृह व्यवस्थेतील गैरव्यवहार हाही मोठा मुद्दा आहे. काही कैदी कारागृहातही आलिशान पद्धतीने राहत असल्याचे अनेकदा समोर आले आहे. 

सुव्यवस्था राखणे अशक्य 

कारागृहात जवळपास क्षमतेपेक्षा दुप्पट कैदी असल्याने राहणीमानाची स्थिती बिकट झाली असून, प्रशासनाला सुव्यवस्था राखणे अवघड झाले आहे. या कारागृहाचा संबंध संघटित गुन्हेगारीशीही जोडला गेला असून, तेथील भिंतींमधून कैदी खंडणीचे रॅकेट चालवत असल्याचा आरोप आहे. सुरक्षेच्या गंभीर त्रुटींमुळे कारागृहात शस्त्रे आणि प्रतिबंधित पदार्थांचा चोरटा व्यापार होण्याचाही धोका आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयासह न्यायालयीन संस्थांनी कारागृह व्यवस्थापनावर वारंवार टीका करत सुव्यवस्था राखण्याची मागणी केली आहे. 

तिहारमधील कैदी 

दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि त्यांचे सहकारी मनीष सिसोदिया, संजय सिंह आणि सत्येंद्र जैन यांना दिल्ली दारू धोरण प्रकरणी तिहार तुरुंगात डांबण्यात आले होते. एकेकाळी दाऊद इब्राहिमचा जवळचा साथीदार असलेला गँगस्टर छोटा राजन यालाही खुनासह अनेक गुन्ह्यांसाठी तिहारमध्ये  ठेवण्यात आले होते. 
 
बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांनी चारा घोटाळ्याप्रकरणी १४ वर्षांची शिक्षा भोगली. आंतरराष्ट्रीय सिरीयल किलर चार्ल्स शोभराज यांनाही तिहारमध्ये कैद करण्यात आले होते.

कोठे होणार स्थलांतर? 

कारागृह प्रशासनाने बापरोला येथे जागा मागितली होती; पण अतिक्रमणामुळे ती मिळू शकली नाही. मात्र, आम्ही दिल्ली सरकारला पत्र लिहून १०० एकर जागा इतरत्र उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे, असे तिहार कारागृहातील सूत्रांनी माध्यमांना सांगितले.

कैद्यांच्या पुनर्वसनावर भर 

कैद्यांच्या पुनर्वसनावर तुरूंग प्रशासन भर देणार आहे. विविध कौशल्य प्रदान कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांचे सर्वांगीण कौशल्य विकसित करून हे साध्य केले जाणार आहे. याशिवाय कारागृहातील विविध कारखाने आणि उत्पादन विभागाच्या कामकाजाचे व्यावसायिकीकरण करण्यात येणार आहे. दिल्ली सरकारची कार्यालये आणि मंत्रालये तिहार, रोहिणी आणि मंडोली येथील तुरुंग संकुलांमध्ये तयार होणार्‍या उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य देतील.

Related Articles